‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस अलाईव्ह’
ऐक्य
-गणेश सावंत
उद्धारली कोटी कुळं
भीमा तुझ्या जन्मामुळे
झाले गुलाम मोकळे
भीमा तुझ्या जन्मामुळे
वामनदादा कर्डक यांच्या शब्दातल्या या जिवंत ओळी आणि काल दलित ऐक्य मोर्चात एकवटलेले माणसे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि स्वाभिमानामुळेच एकवटले हे सांगायला पुन्हा भविष्यकाराची गरज नाही. बीड जिल्ह्याच्या इतिहासात यापूर्वी कधी झाला नाही असा न भूतो न भविष्यती मोर्चा बीडमध्ये झाला. मोर्चेकर्यांच्या मागण्या ऍट्रासिटी कायदा अधिक कठोर करण्यात यावा, कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीसह अन्य महत्त्वपूर्ण मागण्या घेऊन बीड जिल्ह्यातला दलित वर्ग, मागासवर्ग काल एकत्रित आला. पारतंत्र्यात असताना पांढरतोंड्या इंग्रजांनी भारतावर आणि भारताच्या जनतेवर जे अन्याय-अत्याचार केले त्यापेक्षा अनगिणत अन्याय-अत्याचार पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात उच्चवर्णीय म्हणवून घेणार्या माणसांनीच अछूत म्हणत खालच्या जातींच्या लोकांना वागणूक दिली. भले झाले आंबेडकर जन्माला आले. त्यांनी बंड पुकारला आणि दिनदलित, पथदलितांच्या स्वाभिमानासाठी त्यांनाही माणूस म्हणून जगता यावं यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा केली. आप्तस्वकियांविरोधात उभं ठाकण्याचं धाडस केलं आणि बघता-बघता बाबासाहेबांच्या या प्रयत्नांना अटकेपार यश आलं. त्या यशाचं गमक कायम असेल तर अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो हे बाबासाहेबांनी अन्याय पचवणार्यांच्या मना मनात आणि नसानसात भिनवलं तेंव्हा मागास म्हणून राहणार्या या दलित वर्गाने आपणही माणूस आहोत, आपल्यालाही हक्क आहे आणि त्यासाठी आपल्यालाही या देशात आपले अधिकार मागता येतात याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून हा अखंड दलित समज एकत्रित येऊ लागला. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, भारत माझा देश आहे, मी या देशाचा मालक आहे, घराघरावर अशा पाट्या लावा, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे तो जो पेयील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि सत्यासाठी कायदा हातात घेतला तरी चालतो, या तिनच गोष्टी मागास म्हणून राहिलेल्या लोकांच्या मस्तकात उतरल्या आणि त्यांना आपल्या न्याय-हक्कांची जाणीव जाली. हे सर्व करायचं असेल तर एकी महत्त्वाची. म्हणूनच बाबासाहेबांच्या त्या विचारांवर देशातला आजही दलित वर्ग एकत्रित येतो ही ताकत इ.स. 1998 नंतर देशात नव्हे तर बीडमध्ये काल पहावयास मिळाली. बाबासाहेबांनी माणूस असून गुराढोरांसारखं जिवन जगणार्यांना स्वाभिमान दिला आणि त्या स्वाभिमानाची शक्ती ऐक्यात आहे, एकीत आहे हे सांगितलं. परंतु दुर्दैवाने देशात आणि महाराष्ट्रात दलितांचं ऐक्य राहिलच असे नाही. परंतु काल बीडमध्ये हे ऐक्य याची देही याची डोळा पाहितलं आणि पुन्हा जगाच्या पाठीवर आंबेडकरांच्या न्याय-हक्काच्या लढाईनंतर एक वाक्य घुमत होतं ते होतं ‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस देन अलाईव्ह’ (मृत आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकर हे खतरनाक असतील) म्हणजेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांच्या मना मनात, तनातनामध्ये अन्यायाविरुद्ध एवढी चीड निर्माण केली की जो कोणी दिनदलित, पथदलितांवर अन्याय-अत्याचार करील त्याविरोधात प्रत्येक आंबेडकरवादी आंबेडकर म्हणूनच लढेल. परंतु ही लढाई सत्याची असेल आणि तीच लढाई सत्य आणि संयमाचीकाल बीडमध्ये पहावयास मिळाली. प्रज्ञा, शील, करुणा या बुद्धांच्या पंचशिलातील तत्त्वांवर चालणारा बौद्ध, दिनदलित, पथदलित काल बौद्धांच्या आचार-विचारांवरच मोर्चामध्ये चालत होता. बीड शहरातील रस्त्यांवर किती लोक असतील याची संख्यात्माक भाष्यला जेवढं महत्त्व नाही तेवढं लोक किती, कुठून, कसे येतात आणि मोर्चात आलेला प्रत्येक व्यक्ती बुद्धांपासून आंबेडकरांपर्यंत कसा मंत्रमुग्ध होता, न्याय-हक्कासाठी आणि सत्यासाठी बाबासाहेबांची आठवण कसा काढीत होता हे अधिक महत्त्वाचं. बीडच्या दलित ऐक्य मोर्चात ‘किती होते रे लोक?’ ही आवई आणि विचारपूस सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोनातून काल रात्रभर कुठं न कुठं चर्चीली जात असेल. त्याचं एकच उत्तर किती होते... लाख लाख. त्याला किती संख्या लावायची हे ज्याने त्याने ठरवावे. संख्येपेक्षा मोर्चामध्ये सहभागी झालेले अबालवृद्ध, तरुण-तरुणी, महिला वर्ग, वृद्ध ज्या पोटतिडकीने मोर्चामध्ये आल्या होत्या आणि ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत-चालत आपल्या मागण्या मूक मोर्चातून जगासमोर मांडत होत्या त्या नक्कीच कौतुकास्पद म्हणायला हरकत नाही. काय म्हणावं त्या महिलांच्या, मुलींच्या आणि तरुणींच्या आत्मविश्वासाला, त्यांच्या स्पिरीटला. स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयापयर्ंत तडपत्या उन्हामध्ये या महिला चालत होत्या. महिला किती होत्या, शंभर-पन्ना ? हजार पाचशे? दहा हजार? छे छे लाख लाख! या मोर्चाचं नेतृत्व करणार्या युवती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतील तर अन्य मोर्चात सहभागी झालेल्या महिला या कारंज्याच्याही पाठीमागे होत्या. मग सांगा किती महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या? आपल्या मागण्या मांडताना या मोर्चातल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या मुलीला विचारलं असता त्या एवढ्या पोटतिडकीने मांडायच्या की विश्वास बसत नाही. गावकुसाबाहेर कधी काळी अछूत म्हणून राहणार्या या मुली कधी जिजाऊ झाल्या, झाशीची राणी झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या, कधी रमाई झाल्या हे लक्षातही आलं नाही आणि हेच आणि हेच या देशातलं सर्वात मोठं भाग्य जिथं आमची भगिनी स्वत:वरचा अन्याय पोटतिडकीने मांडण्यासाठी तेवढी धाडसी जाली. हे धाडस आलं कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात जोही निपजेल आणि या लोकांच्या विचारांवर चालेल तो ऐक्याला महत्त्व देईल, शिक्षणाला महत्त्व देईल. हे उघड सत्य कालच्या मोर्चातून पहावयास मिळालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अठरापगड जातीला एकत्रित करण्यासाठी दिनदलित - पथदलितांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा केली. बाबासाहेब होते तोपर्यंत स्वाभिमानाने या देशातला दलित एकत्रित राहत होता, परंतु दुर्दैवाने बाबासाहेब बौद्धवासी झाले आणि तेथून दलितांमध्येही मोठ्या संख्येने फूट पडत गेली. अनेक पक्ष-संघटना होत गेल्या. एक नव्हे दोन नव्हे चाळीसपेक्षा जास्त नुसत्या दलितांच्या पक्ष-संघटना आहेत. कधीकाळी बामणाघरी लिवूण, कुणब्या घरी धान, महारा घरी गाणं अन् कोल्हाट्या घरी नाचणं अशी स्थिती होती. ती आंबेडकरांनी मोडीत काढली आणि सर्वांना शिक्षणाचे आणि सर्व क्षेत्रातले दारे खुले केले ते केवळ एकीच्या बळावर. दुर्दैवाने ती एकी गेल्या दोन दशकामध्ये देशातील दलितांच्या पक्ष-संघटनांमध्ये दिसून येत नाही.
ते ऐक्य काल दिसले
इ.स. 1990, 1994, 1998, 2011 या चार वेळी दलित ऐक्य राज्यातील दलित राजकारण्यांनी प्रत्यक्षात घडवून आणले. पैकी 1998 ला लोकसभा निवडणुकीत ऍड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेन्द्र कवाडे, रा.सू. गवाई आणि रामदास आठवले हे निवडून आले. त्यानंतर ऐक्याचं कवित्व संपलं. दलितांच्या या नेत्यांनी आपल्या वेगवेगळ्या चुली उभ्या केल्या. आपआपले शक्तीप्रदर्शन सुरू ठेवले त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातला एकवटलेला माणसू दलित नेत्यांच्याच सत्तेच्या स्वार्थामुळे विघटीत होत राहिला. कुठलाही दलितांमधला नेता उठायचा, एखादं पद घ्यायचा, शे-दोनशे लोक पाठीमागं घ्यायचे आणि स्वत:ची पक्ष-संघटना स्थापन करायची यामुळे आजमितीला महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त पक्ष-संघटना आहेत. त्यामुळे आंबेडकरांच्या विचारांवर आणि तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चालणारा हा दलितवर्ग कालच्या दशकामध्ये एकमेकांपासून लांब होत राहिला. याची जाणीव महाराष्ट्रात घडलेल्या दलित अत्याचाराच्या घटनेवरून दलितांना होत राहिली, परंतु दलितांचा ऐक्य पुन्हा कसं घडवून आणायचं, ते कोणी आणायचं या विचारात सर्वसामान्य दलित राहिला.
परंतु अखेर बीडच्या आंबेडकरवाद्यांनी, तथागत गौतम बुद्धांच्या अनुयायांनी वेगवेगळ्या पक्ष-संघटनांचे झेंडे घराच्या कोपर्यात ठेवणे पसंत केले, आम्ही अन्याय सहन करणार नाही, आम्ही गुलाम नाहीत, आम्ही या देशाचे मालक आहोत ही चेतना पुन्हा नसा-नसांमधून उफळून निघाली आणि बीड जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती, तांड्यावरून, डोंगरपट्ट्यावरून, माळरानावरून जो तो दलित ऐक्यात सामील झाला आणि बीड जिल्ह्यालाच नव्हे तर अखंड महाराष्ट्राला या मूक मोर्चाने अस्पष्ट सांगून टाकले, ‘आम्हावर अत्याचार कराल, अन्याय कराल तर ‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस अलाईव्ह.’
No comments:
Post a Comment