Wednesday, 26 October 2016


वेदाचा तो अर्थ आम्हासी ठाव । इतरांनी वहावा भार माथा ॥

प्रक्षुब्ध मनाचा 

नि:शब्द हुंकार 


-गणेश सावंत-



मॅराथॉन अग्रलेख भाग-1




का
ळ्या आईचं हृदय चिरून एक दान्यावर हजार ते लाख-लाख दाने निर्माण करणारा मराठा समाज. राष्ट्रावर आणि राज्यावर संकट आलच तर गवताचेही भाले करत संकटाला सामोरे जाणारा मराठा समाज आपल्या स्वराज्यावर आणि राज्यावर भले कोणीही चालून आले तर त्याच्याशी दोन हात करत विजयश्री खेचून आणणारी लढवय्या जमात म्हणजे मराठा समाज. इतिहासाच्या पाना-पानामध्ये मराठ्यांच्या रक्ताळलेल्या लढाया आणि विजयश्री पाहितली तर मराठ्यांची मनगटे कायम समाज रक्षणासाठी शिवशिवतात हे उघड सत्य आतापर्यंत नाकारता येणार नाही. म्हणूनच जेंव्हा जेंव्हा मराठा समाज पेटून उठला तेव्हा तेंव्हा काळालाही मराठा समाजाच्या मानगुटीवर नव्हे तर त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये नाचावं वाटलं. हे शब्दात सांगणं किंवा शब्दात मांडणं जेवढं चांगलं वाटतं तेवढच मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, परंतु मराठ्यांचं स्वराज्य उभारल्यानंतर राज्यामध्ये पेशवाई आली आणि पेशवाईच्या भौतिक सुखाच्या आहारी महाराष्ट्रातील धनदांडगी मराठ्यांची घरे गेली आणि तेथूनच शिवशिवणार्‍या मराठ्यांच्या मनगटांचा वापर छूत-अछूत हे म्हणण्यासाठी आणि दारिद्य्रात खितपत पडलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी होत गेला. परिणामी अठरा विश्‍व दारिद्रयात असलेली जमात हे पराकोटीचे अत्याचार सहन करत राहीली हे उघड सत्य कोणालाही आणि केंव्हाही नाकारता येणार नाही, परंतु महाराष्ट्राची माती ही नरवीरांची माती आहे. महाराष्ट्राची माती ही सत्याला महत्त्व देणारी, सत्याची चाड आणि असत्याची चीड निर्माण करून सोडणारी माती आहे. या मातीमध्ये शाहू-ङ्गुले-आंबेडकर जन्माला आले. त्यापूर्वी जगद्गुरू संत तुकारामांनीही अशा व्यवस्थेविरुद्ध रणसिंग ङ्गुंकले होते. अखेर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात बदल होत राहिले आणि महाराष्ट्रासह देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मुभा मिळाली. ही मुभा झगडा करून, अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यानंतर मिळाली. हा इतिहास सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, बंगले इमले आणि शेतीसह पाटीलकी गाजवणार्‍या महाराष्ट्रातील बहुसंख्याक मराठा समाजात आज अठराविश्‍व दारिद्रय उघड होत चालले आहे. किर्तीवान आणि मेहनती समाजाची दशा आणि दिशा आज अशी का? या प्रश्‍नाचे उत्तर मराठा समाजाच्या ठराविक घराण्याकडे बोट दाखवायला लावते आणि ते बोट तेवढेच सत्याकडे दाखवले जाते. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. औरंगाबादेत मराठ्यांचा मोर्चा झाला. तो अभूतपूर्व निघाला त्यानंतर बीडमध्ये मराठ्यांनी मोर्चा काढला, तो न भूतो ना भविष्यती असा राहील असा वाटला. परंतु महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात मराठे रस्त्यावर उतरू लागले. लेकीबाळी रस्त्यावर आल्या. आपल्या न्याय हककासाठी भांडू लागले, परंतु इतिहास साक्षीला आहे मराठे जेंव्हा रस्त्यावर उतरले तेंव्हा उतरलेल्या 
मराठ्यांना दुभंग 
करण्याचे कटकारस्थान सातत्याने रचण्यात आले. आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून यावर भाष्य केलं नाही. आजपासून मॅराथॉन अग्रलेख बीड जिल्ह्यातल्या वाचकांसाठी केवळ मराठ्यांच्या मोर्चावर लिहित आहोत. या अग्रलेखाचा उद्देश मराठ्यांच्या मोर्चामधील मराठ्यांच्या सर्वसामान्य माणसांची भूमिका, सरकारची भूमिका, मोर्चाचं श्रेय घेण्याचा खटाटोप त्याचबरोबर मराठ्यांचा सरकारसह कुठल्याच पक्षाच्या नेत्यांवर नसलेला विश्‍वास यावर भाष्य करणार आहोत. बीडचा मोर्चा झाल्यानंतर राज्यात अनेक मोर्चे झाले, त्या मोर्चांना मराठ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. सरकारच्या उरात धडकी भरली. वेगवेगळ्या पक्षातील मराठा नेत्यांच्या भुवया वर झाल्या, तोंडाला कोरड पडली, परंतु या मोर्चाला दुभंगण्याचा आणि मोर्चाच्या मागण्यांतून जातीवाचक मोर्चाला झालर लावण्याचं काम काही नत्द्रष्ट पैदासींकडून होताना दिसून येऊ लागलं. मराठ्यांच्या मागण्या कोपर्डीतील बलात्कार प्रकरणात असलेल्या आरोपीतांना ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, यासह अन्य मागण्यांवर मराठे रस्त्यावर उतरले. यामध्ये ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो त्यामुळे त्या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, अशा प्रकारची एक मागणी मराठे मोर्चाकरांच्या मागण्यांच्या निवेदनातून दिसून येते. तेवढ्याच मागणीला टार्गेट करत महाराष्ट्रातील जातीवादी शक्तींनी ज्या पद्धतीने दलित-मराठा वाद लावण्याचे कटकारस्थान रचले आणि मराठ्यांविरुद्ध दलित, दलितांविरुद्ध मराठा असे विषारी ङ्गुसकार सोशल नेटवर्किंग मीडियातून सोडायला सुरुवात केली. ते राज्यासाठी हानीकारक म्हणावेच लागेल. कारण हा मोर्चा 


प्रक्षुब्द मनाचा 

नि:शब्द हुंकार 


आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडे होत असलेले दुर्लक्ष राज्याच्या नेतृत्वात मराठ्यांचे काही घराणे असताना वाडी-वस्तीवर आणि ग्रामीण भागावर, डोंगराळ भागावर राहणार्‍या मराठ्यांकडे, त्यांच्या घराकडे, त्यांच्या मुलभूत गरजांकडे, लेकरांच्या शिक्षणाकडे आणि अखंड समाजाच्या आरोग्याकडे, भविष्याकडे जे दुर्लक्ष केलं गेलं, मराठा समाज हा संख्येने मोठा आहे म्हणून प्रत्येक वेळा बहुजनाची टिमकी वाजवत त्यांच्याकडे जाणं टाळलं. त्यांचा आर्थिकच नव्हे तर बौद्धीक विकास करण्या
लाही आडवं पाडण्यात आलं. तेंव्हा दशको ना दशकोमधील मराठ्यांची समाज व्यवस्था, शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली. गावागावातला मराठा अंत:करणातून संतापून गेला आणि ती खदखद कोपर्डीच्या प्रकरणातून लव्हा रसाप्रमाणे बाहेर पडली. परंतु गेल्या चाळीस - पंचेचाळीस दिवसांपासून मराठ्यांचे मोर्चे लाखानिशी निघताहेत, या मोर्चाची दखल गेल्या आठ दिवसांपर्यंत ना सरकारने घेतली ना सत्याचा डांगोरा पिटवणार्‍या महाराष्ट्रातील आणि देशातील मीडियाने घेतली. हार्दिक पटेल सारख्या तरण्याताठ्या पोराचं आंदोलन जगाला दिसून येतं, परंतु मराठ्यांचं आंदोलन महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या तथाकथीत सत्याची भूमिका घेऊ पाहणार्‍या मीडियाला दिसलं नाही. याचा उघड अर्थ आजही सोळाव्या शतकातील जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था या देशात आणि या महाराष्ट्रात आहे. दलितांवर अत्याचार होतात हे जेवढं सत्य आहे आणि त्या अत्याचाराचा वापर देशातील राजकारणी राजकारणासाठी करतात हे तेवढच सत्य आहे. परंतु मराठ्यांवर होत असलेले अत्याचार दाखवण्यात आले आणि राज्यासह देशातील मराठा बाहेर पडला तर कोणा कोणाच्या चड्ड्या पिवळ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत याची जाण मनुवादी मीडियाला आहे म्हणूनच मराठ्यांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु प्रक्षुब्द मनाने बाहेर पडलेला मराठा हाताची घडी तोंडावर बोट ठेवत रस्त्याने मूकमोर्चा काढतोय. लाखाने लोक बाहेर पडताहेत. आपल्या मागण्या निवेदन स्वरुपामध्ये प्रशासन आणि शासन दरबारी देताहेत. एकेकाळी हर हर महादेवची ललकारी देणारा आज शांततेच्या मार्गाने नि:शब्द होत शिस्तीने चालतोय मग मराठे या मोर्चामध्ये मुके असताना त्यांच्या मागण्या ठरवणारे कोण? मराठ्यांनी आपल्या मोर्चाच्या निवेदनात ऍट्रासिटी ऍक्ट रद्द कराची मागणी केलेलीच नाही तर ही मागणी केली असं म्हणत बोंब ठोकणारे ते महाभाग कोण? याची ओळख मराठ्यांच्या लोकांनी आणि दलितांच्या लोकांनी आता करून घ्यायला हवी. प्रत्येक पक्षातला मराठा असो वा मराठेत्तर असो तो केवळ अशा मोर्चांचा उपयोग स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी करून घेणार. हे उघड सत्य कुठल्याही समाजातल्या लोकांनी असत्य समजू नये कारण जोपर्यंत माणसातला माणूस हा माणसासारखा उघड डोळ्याने पाहणार नाही , उघड कानाने ऐकणार नाही तोपर्यंत राजकीय पोळी भाजून घेणार्‍या तथाकतीत वळ्यावगळीच्या पैदासी आपल्या उरावर बसून थयाथया नाचणार हेही या अनुषंगाने सांगावसं वाटतं. प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार टाकत मराठे जेवढ्या ताकतीने बाहेर पडले आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याला सोबत न घेता हा सकळ मराठ्यांचा मोर्चा आहे असं म्हणत थेट जगद्गुरू संत तुकोबांच्या विचारांवर

वेदाचा तो अर्थ आम्हासी ठाव ।

इतरांनी वहावा भार माथा ॥


असं ठणकावून सांगत मराठे रस्त्यावर उतरले. 



No comments:

Post a Comment